विद्यार्थ्यांसाठी

गोष्टी:

म्हशीच्या पाठीवर बगळा असतो. का?
म्हैस चरताना तिच्या पाठीवर बगळा बसतो. का?
म्हैस रानात चरायला जाते. बगळ्याला भूक लागते. पण त्याला गवतावरचे किटक दिसत नाहीत.
म्हैस चालायला लागले की घाबरुन किटक उडतात. हवेत उडालेल्या किटकांना बगळा खातो.
आहे की नाही बगळ्यांने अन्न मिळविण्यासाठी शोधलेला हा सोपा मार्ग?

अकबर बिरबल गोष्टरेष
अकबर आणि बिरबल फिरायला गेले. अकबराने वाळूत पायाने रेष ओढली.
ही रेष तू छोटी करशील का? त्याने बिरबलाला विचारलं.
“हो.” बिरबल म्हणाला.
“पण रेष पुसायची नाही.” अकबर म्हणाला.
बिरबलाने एक लहान रेष काढली आणि अकबराकडे हसून पाहिलं.

वाढदिवसाची भेट
निता आणि रमेश बहीण, भाऊ होते. बाबा त्यांना कधीतरी पैसे देत. दोघं पैसे पेटीत ठेवत. बाबांचा वाढदिवस आला. नीता म्हणाली,
“आपण बाबांना शुभेच्छापत्र देऊ.”
“आणि भेटवस्तू.” रमेश म्हणाला.
“पण पैसे?” निताने विचारलं. दोघांनी विचार केला. पेटीतले पैसे घेतले. शाळेत गेले. परत येताना दोघं बाजारात गेले. वाटेत त्यांना चिराग भेटला.
“चिराग तू शाळेत का आला नाहीस?” रमेशने विचारलं.
“आजी आजारी आहे.”
“हो? मग दवाखान्यात ने.” निता म्हणाली. चिराग रडायला लागला.
“का रडतोस?”
“पैसे नाहीत माझ्याकडे.”
“आजीकडे?”
“तिच्याकडेपण नाहीत.”
“तुझ्या आई – बाबांकडे?”
“मला आई -बाबा नाहीत. मी आजीकडे राहतो.”
रमेशला वाईट वाटलं. नितालाही. दोघांनी काहीतरी ठरवलं. निताने पैसे पुढे केले.
“हे घे.” रमेश म्हणाला.
“आजीला दवाखान्यात ने.” चिराग रडायचा थांबला. रमेश आणि निता घरी आले. बाबांना शुभेच्छापत्र दिलं.
“बाबा, आम्ही तुमच्यासाठी भेटवस्तू आणणार होतो.” निता म्हणाली. रमेशने चिरागला पैसे दिले ते सांगितलं. बाबा खुष झाले. म्हणाले,
“बाळांनो, हीच मोठी भेट दिली तुम्ही मला. शाब्बास.” बाबा म्हणाले. त्यांनी निता, रमेशला जवळ घेतलं.

गाढव आणि घोडा
सदूकडे गाढव आणि घोडा असतो. तो दोघांच्या पाठीवर सामान ठेवतो. बाजारात माल विकायला निघतो. गाढव खूप दमतं. घोड्याला म्हणतं,
“माझं सामान तू घे ना थोडं.” घोडा ऐकत नाही.
गाढव थकून खाली बसतं. सदू सगळं सामान घोड्याच्या पाठीवर ठेवतो. घोडा कसाबसा चालत राहतो. घोड्याने गाढवाचं थोडं सामान आधीच घेतलं असतं तर?

डास आणि मूर्ख मुलगा
एक सुतार होता. तो मेहनती होता. त्याचं वय झालं होतं. त्याच्या डोक्यावरचे केस कमी झाले. अखेर त्याला टक्कल पडलं.
एकदा त्याच्या डोक्यावर डास बसला. तो चावत होता. सुताराने त्याला झटकलं. पण डास पुन्हा डोक्यावर बसला. सुताराने मुलाला बोलावलं,
“या डासाला मार रे. खूप त्रास देतोय.” सुतार म्हणाला. मुलाने काठी घेतली. सुताराच्या डोक्यावर मारली. डास उडाला. पण सुतार जखमी झाला.

बापूंच्या ३ गोष्टी
रामला दुकानात काम मिळालं. दुकानदार म्हणाला,
“राम, बापूंच्या ३ गोष्टी लक्षात ठेव.”
“बापू कोण?” रामने विचारलं.
“महात्मा गांधी.”
“बरं. पण कोणत्या गोष्टी?”
“वाईट बोलायचं नाही, ऐकायचं नाही, पाहायचं नाही.”
“करेन मी तसंच.” राम म्हणाला.

दुकानदार एकदा गावात गेला. तेव्हा दुकानात चोरी झाली.
“अरे मुर्खा, तू काय करत होतास?” दुकानदार चिडला.
राम म्हणाला,
“वाईट पाहायचं नाही म्हणून मी डोळे मिटले. वाईट ऐकायचं नाही म्हणून कानात बोळे घातले. वाईट बोलायचं नाही म्हणून मी काही बोललो नाही.”
“निघ इथून. तू मला बरबाद केलंस.” दुकानदार ओरडला.
राम म्हणाला,
“जातो, जातो. पण तुम्ही असं ओरडताय का. बापूंच्या गोष्टी विसरलात?” आणि रामने तिथून धूम ठोकली.

ससा आणि कासव
एक होता ससा. एक होतं कासव. ससा जोरात धावायचा. कासव हळूहळू चालायचं. एकदा दोघांनी शर्यत लावली. जंगलं संपतं तिथे पोचायचं. जो आधी पोचेल तो जिंकला. ससा धावायला लागला. कासव चालायला लागलं. ससा झाडापाशी पोचला. त्याने मागे वळून पाहिलं. त्याला कासव दिसलं नाही. कासव येईपर्यंत झोपायचं असं त्याने ठरवलं. कासव सशापाशी पोचलं. त्याने सशाला झोपलेलं पाहिलं. ते चालत राहिलं. ससा उठला. पुन्हा त्याने मागे वळून पाहिलं. कासव दिसत नव्हतं. ससा खूश झाला. धावत धावत निघाला. जंगल संपलं. पण कासव तिथे आधीच उभं होतं. जोरात धावणारा ससा हरला. हळू चालणारं कासव जिंकलं.

घरभर प्रकाश
एक गाव होतं. गावात एक शेतकरी राहत होते. त्यांचं नाव केशवकाका. त्यांना दोन मुलं होती.
एकदा केशवकाकांनी मुलांना दोन – दोन रुपये दिले. ते म्हणाले,
“मुलांनो, या पैशातून घर भरुन जाईल अशी वस्तू आणाल का?”
मुलं दुकानात गेली. तिथे त्यांना खूप वस्तू दिसल्या. अचानक दोघांना एक कल्पना सुचली. दोघांनी एक पणती विकत घेतली. मुलं घरी आली. पणतीत तेल घातले. कापसाची वात केली. संध्याकाळी पणती लावून ठेवली.
केशवकाका खूष झाले.
“कमालच केली तुम्ही.” ते म्हणाले. मुलं म्हणाली.
“आम्ही घर भरुन जाणारी वस्तू आणली. घरात सगळीकडे प्रकाश भरला आहे.”
केशवकाकांनी मुलांना जवळ घेतलं. ते म्हणाले,
“तुमची कल्पकता आवडली. शाब्बास.”

दिनूचे बिल
दिनूचे वडिल वैद्य होते. दिनू त्यांच्याबरोबर दवाखान्यात जात असे. तिथे खूप रोगी येत. कोणी म्हणे, ’माझं पोट दुखतंय.’ तर कोणी म्हणे, ’माझं बिल किती झालं ते सांगा.’
दिनू सर्व ऐकत असे. खूप गोष्टी त्याला कळायला लागल्या. पण बिल म्हणजे काय ते त्याला कळत नव्हतं.
“बाबा, बिल म्हणजे काय हो?” एकदा त्याने विचारलंच.
वैद्यांनी एक कागद दाखवला. कागदावर लिहिलेलं दिनू वाचायला लागला.
तपासणी – १० रुपये.
घरी येण्याबद्दल – २० रुपये
औषध – ८ रुपये.
एकून – ३८ रुपये.
दिनूने बिल वाचलं. त्याला एक कल्पना सुचली. दिनू घरी गेला. आईच्या नावे त्याने बिल तयार केलं.
बागेतून फुलं आणली – ५० पैसे.
बाळाला सांभाळलं – २ रुपये.
काकूंना निरोप दिला – १ रुपया.
साखर आणली – ५० पैसे.
बिल त्याने आईच्या खोलीत नेऊन ठेवलं.
दुसर्‍या दिवशी दिनू सकाळी उठला. त्याच्या उशीपाशी ४ रुपये ठेवले होते. दिनूने ते उचलले. तेवढ्यात आणखी एक कागद त्याला दिसला. दिनूच्या नावाने आईने बिल केलं होतं.
मोठा केल्याबद्दल – काही नाही.
आजारी असताना काळजी घेतल्याबद्दल – काही नाही.
गोष्टी सांगून करमणूक केल्याबद्दल – काही नाही.
वाचायला शिकवल्याबद्दल – काही नाही.
दिनूला रडायला आलं. तो आईला बिलगला. आईचे पैसे त्याने परत केले.

मोटू उंदीर
मोटू नावाचा उंदीर होता. तो खट्याळ होता. सारखा बिळाबाहेर खेळायचा. आई त्याला सांगायची, “मोटू, मांजर तुला पकडेल. बाहेर खेळू नकोस.” मोटू म्हणायचा, “मी नाही लपून बसणार. मला खेळायला आवडतं.” एकदा तो सोनूच्या घरी गेला. सोनू आंघोळ करत होता. सोनू बाहेर आला. मोटू आत गेला. साबणाची बाटली मोटूने कुरतडली. सगळा फेस बाहेर आला. मोटूच्या अंगावर सांडला. काळा मोटू पांढरा झाला. सोनूने मोटूला पाहिलं. सोनू किंचाळला. मोटू पळाला. मोटू घरी आला. पण त्याला कुणी ओळखलं नाही. तो इकडे तिकडे फिरत राहिला. मांजराने त्याच्यावर झडप घातली. मोटू गटारात पडला. पाण्यात बुडाला. त्याची आंघोळ झाली. मोटू पुन्हा काळा झाला. तो घरी आला. सर्वांनी त्याला ओळखलं. मोटू आता आईचं ऐकतो. तो बिळातच राहतो.

घारीची चलाखी
कावळ्याला बदाम सापडतो. कठीण कवचामुळे त्याला तो फोडता येत नाही. घार त्याला झाडावरुन बदाम खाली टाकण्याचा सल्ला देते. कावळा तिचं ऐकतो आणि घार कावळ्याने खाली टाकलेला बदाम खाऊन निघून जाते.
तात्पर्य – सल्ला ऐकून घ्यावा, पण आपणही विचार करावा.

चतुर बिरबल
शिवराम गाय घेऊन घरातून निघाला. बाजारात नेऊन तो गाय विकणार होता. मागून सदा येत होता. त्याने जबरदस्ती करुन शिवरामची गाय घेतली. शिवराम बादशहाकडे गेला.
“सदाने माझी गाय चोरली.” शिवरामने तक्रार केली. बादशहाने गाय घेऊन सदाला दरबारात बोलावलं.
“ही गाय माझी आहे.” सदा म्हणाला.
बादशहाने बिरबलाचा सल्ला मागितला. बिरबलाने शिवरामला गाईचे नाव विचारले आणि दोघांना दूर उभं राहायला सांगितलं.
“गाईला तिच्या नावाने हाक मारा.” त्याने हुकूम सोडला. दोघांनी हाक मारली. गाय शिवरामजवळ येऊन उभी राहिली.
“आता दोघंही गाईकडे पाठ फिरवून चालायला लागा.” दोघांनी चालायला सुरुवात केली. गाय शिवरामच्या मागून जायला लागली.
बादशहाने गाय शिवरामला परत केली आणि सदाला शिक्षा सुनावली.

सावित्रीबाई फुले
दिडशे वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. पुण्यातल्या भिडेवाड्याकडे एक स्त्री लगबगीने निघाली होती. रस्त्यावरचे लोक तिला पाहून फिदीफिदी हसायला लागले. वाईट, वाईट बोलू लागले. कोणीतरी तिच्यावर शेणगोळे, दगड फेकले. शांतपणे ती स्त्री म्हणाली,
“तुम्ही त्रास दिलात तरी मी माझं काम सोडणार नाही.”
कोण होती ती तरुण स्त्री?
ती स्त्री होती, पहिली भारतीय शिक्षिका सावित्रीबाई फुले. त्या काळात स्त्रियांना शिकायला परवानगी नव्हती. त्यामुळे सावित्रीबाईंना खूप विरोध झाला. पण मग सावित्रीबाई कशा शिकल्या? महात्मा ज्योतीराव फुले हे त्यांचे पती. त्यांनी सावित्रीबाईंना वाचायला, लिहायला शिकवले. त्या कविता लिहू लागल्या. भाषणे देऊ लागल्या.
ज्योतीराव फुलेंच्या प्रेरणेने त्या शिक्षिका झाल्या. ’शिक्षणामुळे ज्ञान मिळते, माणूस विचार करतो आणि आजूबाजूची परिस्थिती बदलतो.’ यावर त्यांचा विश्वास होता.
ज्योतीराव फुलेंनी भिडेवाड्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली. मुली शिकल्या तर समाजाची प्रगती होईल हे त्यांना ठाऊक होते. सावित्रीबाईंमुळे तिथे मुली शिकायला यायला लागल्या.

बदकाची हुशारी
एक बदक राजकन्येबरोबर अभ्यास करायला लागतं. वाचायला लिहायला शिकतं. इतर बदकं त्याची चेष्टा करतात. पण बदक दुर्लक्ष करतं. एकदा राजा मेजवानीचा बेत आखतो. राजवाड्यातील स्वयंपाकी बदकाला भाजायचं ठरवतो. पण लिहिता वाचता येणारं बदक त्याचा बेत चलाखीने बदलायला लावतं.


गाणी / कविता

थेंब

थेंब गेला खेळायला
लागला सारखा पडायला!

थेंब खूप घाबरला
पानावरुन घसरला!

फुलामध्ये अडकला
जोरात आला वारा!

थेंब हलला, जोरात डुलला!
खाली पडला आणि नाहिसा झाला!

एक होतं झुरळ

एक होतं झुरळ
चालत नव्हतं सरळ!
बसमध्ये चढलं
तिकीट नाही काढलं!
कंडक्टरने पाहिलं
चिमटीत धरुन फेकलं!

बाहुली

लहान माझी बाहुली
मोठी तिची सावली!

घारे डोळे फिरविते
नकटे नाक उडविते
गोबरे गाल फुगविते!

पोळ्या केल्या, करपून गेल्या
भात केला, कच्चा झाला!

वरण केलं, पातळ झालं
तूप सगळं सांडून गेलं!
असे भुकेले राहू नका

करते मी खाऊ
केळ्याचं शिकरण करायला गेली
भरले दोन्ही हात!
आडाचे पाणी काढायला गेली
धुपकन पडली आत!

मी आहे…

मी आहे लहान
पण उद्योग महान!

इकडून तिकडे पळायचे
पाहूनच सगळे दमायचे!

खेळायचे नविन खेळ
खायलाही नाही वेळ!

बडबड माझी फार
दमतात आईचे कान!

सारखी मी नाचते
कधीतरी वाचते!

बाबा म्हणतो
हुशारीचा प्रकाश पडतो!

कविता, गाणी पाठ
वय  फक्त आठ!

वय माझं नऊ
प्रश्न पडलाय
आता कोण मी होऊ?

झालोय मी मोठा
वय वर्ष दहा
बाबा म्हणतात,
उद्याचा शास्त्रज्ञ पाहा!

खुर्ची म्हणाली स्टुलाला

खुर्ची म्हणाली स्टुलाला
केव्हा येणार चालायला तुला?
स्टुल म्हणालं,
जेव्हा वाजवशील तू टाळी तेव्हा
(आकडे म्हणत टाळ्या – २५)
हे ऐकून पंखा हसला
पाय नसून गरागरा फिरला!

वारांचं गाणं
सोमवार म्हणजे Monday
मंगळवार म्हणजे Tuesday
आम्ही गिरवतो मराठीचे धडे!
wednesday म्हणजे बुधवार
Thursday म्हणजे गुरुवार
काहीतरी पाहिजे गारेगार!
Friday म्हणजे शुक्रवार
Saturday म्हणजे शनिवार
आठवड्यात आहेत सात वार!

अवयव
हात पाय, हात पाय
उजव्या पायाची बोटं पाच!

हात पाय, हात पाय
डाव्या पायाची बोटं पाच!

हसताना दिसले दात
मी तोंडावर धरला हात!

कोपराने ढोसले, हाताने ढकलले
लागले, लागले मला खूप लागले!

खांदा, मनगट, ढोपर
कुठे हरवले!

कपाळावर पडली आठी
भुवई, बेंबी राहिली ना पाठी!

संगत
निळं आकाश
अंधुक प्रकाश
चमकता तारा
गार वारा!

चल ना आई,
जमिनीवर झोपू!
आकाशातल्या चांदण्या
किती ते मोजू!

चंद्र आला सोबतीला
बाबा लागला गायला!
ही खरी गंमत
अशीच हवी रोज संगत! –  – मोहना

स्वयंपाक
ढवळली आमटी डावाने
परतली पोळी काविलथ्याने
खाऊ सारं चवीचवीने!

चव तिखट चटणीची
मजा आंबट लोणच्याची
सोबत आहे कडू कारल्याची!

वेळ झाली स्वयंपाकाची
गडबड उडाली बाबाची
आईला मदत करायची!

पोळी लाटली वाटोळी
तव्यावर टाकली
टम्म फुगली!

घ्या लवकर ताट वाटी
तयार व्हा जेवण्यासाठी
तांब्या आणि भांडच उरलंय बाकी!