६ ते ७ वेळ २०१८ – २०१९

जून २०२०

२८ जून

लाडू, पुस्तक, भिंत हे शब्द सर्वनामांबरोबर वापरणे.
माझा लाडू खूप गरम आहे.
मी लाडू खाल्ला.
मला लाडू पाहिजे.

तू, तुला, तुझं/तुझे.
ते तुझं पुस्तक आहे.
तू पुस्तक वाच.
तुला पुस्तक पाहिजे?

ती, तिला, तिचं/तिचे.
तिच्या घराची भिंत खूप चांगली आहे.
तिला भिंत खूप आवडते.

२१ जून

तो, ती, ते,वर, ने, ल, खातो, खाल्ला, खाईल याचा वापर करुन गाळलेल्या जागा भरणे. लिहिणे.

तो कागद आहे.
कागद टेबलावर ठेव.

पंखा हाताने पुसतात.
भात चमच्याने खातात
मी हाताने लिहिते.
तिने पंखा हाताने पुसला.
ती पंखा हाताने पुसते.

तो रोज लाडू खातो.
त्याने लाडू खाल्ला.
तो परवा लाडू खाईल.

१४ जून

गाळलेल्या जागा भरणे, शब्दांचं लिंग सांगून तो किंवा ती वापरणे. वापरलेल्या शब्दांचा वापर करुन गोष्ट तयार करणे

दिवा, पंखा, कप, खिडकी, वाटी, आमटी.
तो दिवा, तो पंखा, तो कप, ती खिडकी, ती वाटी, ती आमटी
एक मुलगा आमटी पीत होता. त्याच्याजवळ एक खिडकी उघडी होती. दिवा गार झाला कारण पंखा चालू होता. त्याला गार वाटत होतं म्हणून त्याने खिडकी बंद केली.

७ जून 

वाचणे, लिंग सांगून अनेकवचन सांगणे आणि व्याकरण नियम सांगणे.
तो मुलगा – ते मुलगे
तो ससा – ते ससे
आकारान्त पुल्लिंगी नामाचं अनेकवचन एकारान्त होते.
तो देव – ते देव
तो लाडू – ते लाडू
आकारान्ताशिवाय पुल्लिंगी नामांचं अनेकवचन तेच राहते.


मे २०२०

१० मे
वू, ऊ चा वापर. मिग्लिंश वाक्य मराठीत लिहून दाखवणे.
जाणे, देणे, घेणे , नेणे
Javun ye – जाऊन ये.
Devun ye – देऊन ये.
ghevun ye – घेऊन ये.

लावणे, चावणे, जेवणे, ठेवणे
lavun thev – लावून ठेव.
chavoon kha – चावून खा.
jevoon ghe – जेवून घे.
tehvun de. – ठेवून दे.

लिंग (तो, ती, ते) एकवचन अनेकवचन
तो ससा – ते ससे
तो आंबा – ते आंबे
तो मुलगा – ते मुलगे

३ मे

गोष्ट तयार करणे. वाक्य जोडणे. हळूहळू गोष्टीत रंग भरणे.
मी दार उघडलं आणि खोलीत गेलो.
बघतो तर काय, तिथे एक माणूस होता. तो चोर होता.
आणि एक वही सापडली…

विरुद्ध अर्थी शब्द सांगणे.
वर – खाली
उलट – सुलट
बरोबर – चूक,
खरं – खोटं/खोटे
मागे – पुढे

म्हणी आणि त्याचा अर्थ आणि वाक्यात उपयोग.
चोराच्या मनात चांदणे.
एका हाताने टाळी वाजत नाही.
वासरात लंगडी गाय शहाणी.
अति तिथे माती.

इंग्रजी शब्दांना मराठी शब्द.
discussion – चर्चा
arguments – वाद
speech – भाषण
contagious – संसर्गजन्य


एप्रिल २०२०

२६ एप्रिल

वाचणे आणि क्रम सुधारणे व लिहिणे:
आवडत काम मला नाही करायला – मला काम करायला आवडत नाही.
कामं सांगते आई खूप – आई खूप कामं सांगते.
टाळाटाळ मी करते – मी टाळाटाळ करते.
अभ्यास सांगते आहे जोरात ओरडून मी – “अभ्यास आहे” मी जोरात ओरडून सांगते.
बोलता न आई कामं करते – न बोलता आई कामं करते.
बघते येऊन वर मी तेव्हा चित्र काढत असते – वर येऊन बघते; तेव्हा मी चित्र काढत असते.
लपवते ते मी पटकन – ते मी पटकन लपवते.
जवळ आई घेते मला – आई मला जवळ घेते.
छान रेखाटलंस चित्र – छान चित्र रेखाटलंस.
करते आई कौतुक – आई कौतुक करते.
लाज वाटते मला – मला लाज वाटते.
क्षमा कर – क्षमा कर.
म्हणते मी तिला – मी तिला म्हणते. लपवते

१९ एप्रिल

गोष्ट तयार करणे. त्यात व, नंतर, आणि या सर्वांचा वापर करायला शिकणे.
एक माणूस होता. तो झाडं/ झाडे कापत होता. तो लाकुडतोड्या होता.
तो लाकडे वापरून घर बांधत होता तितक्यात तिथे एक कुत्रा आला.
कुत्रा माणसाला चावला त्यामुळे त्याला रक्त यायला लागलं. तो चालू शकत नव्हता कारण त्याला खूप दुखत होतं. कुत्रा गेला.
मग मांजर आलं/आले. मांजराने माणसाला ओढून गावात नेलं. मांजर बोलले आणि मांजर गेले. तो डॉक्टरकडे गेला आणि बरा झाला.
शा/श्या चा वापर
तो डोसा – डोशाची चटणी
तो मासा – माशाची चटणी
तो ससा – सशाची चटणी
ती माशी – त्या माश्या
ती बशी – त्या बश्या
ती उशी – त्या उश्या

समानार्थी शब्द लिहिणे.
घर – सदन, भवन, गृह, आलय, निकेतन
आई – माता, जननी, माय, माऊली
आनंद – हर्ष, मोद, संतोष
देऊळ – मंदिर, देवालय, राऊळ
देव – सुर, ईश्वर, अमर, निर्मिक

१२ एप्रिल २०२०

कविता आणि त्यातील शब्दांचे अर्थ.

जगावी मराठी कविता
मनापासूनी रोज गावी मराठी
फुलावी फळावी जगावी मराठी

नभी चंद्र तारे असे जोवरी हे
गड्या तोवरी ही टिकावी मराठी

फुलांतून कळ्यांतून झरावी
नद्यांतून झर्‍यातून हसावी मराठी

नसो जात कुठली नसो धर्म कुठला,
सरो द्वएष सारा उरावी मराठी

घरा – वावरातून मृदेच्या मुखातून..
तुक्याच्या विणेतून म्हणावी मराठी..

मराठी मराठी मराठी मराठी
आता राजभाषा ठरावी मराठी

नितीन देशमुख
किशोर मासिक फ्रेबुवारी २०१९

लेखन, वाचन
सुर्य पश्चिमेला मावळतो.
कोरोना विषाणू आहे.
शाळेला सुटी आहे.
मला कंटाळा आला.

५ एप्रिल २०२०

परत
परत ये, परत जा, पोळी परत, वस्तू दुकानात परत कर, परतफेड. ’परत’ या शब्दाचा वाक्यानुसार अर्थ समजून घेणे. प्रत्येकाने हा शब्द वापरून वाक्य सांगणे. लिहिणे.
गोष्ट:
राज नावाचा मुलगा सगळ्या गोष्टी आरामात करणारा त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्टीला उशीर होत असतो. शाळेतून रमत – गमत येणार, कुठे काही दिसलं की त्यात रमून जाणार असं त्याचं चालू असतं. त्यामुळे त्याच्या आईने ठरवलेल्या गोष्टी होत नाहीत की त्याने ठरवलेल्या. आई एक दिवस त्याला सांगते की तू जो वेळ घालवतोस तिथे तिथे जाऊन तुला परत आणता येतो का बघ. राज प्रयत्न करतो तेव्हा त्याच्या लक्षात येतं की वेळ फुकट गेला असेल तर तो परत आणता येत नाही. त्यानंतर तो अशाप्रकारे आपण वेळ फुकट घालवायचा नाही हे निश्चित करतो.

मार्च २०२०

२९ मार्च
वाचन
तो मुलगा आहे. त्याला चॉकलेट आवडतं. त्याने त्याच्या वाट्याचं चॉकलेट आईला दिलं.
तिला त्याचं खूप कौतुक वाटलं. आम्ही सगळ्यांनी भरपूर चॉकलेट खाल्ली.
ऑ, त + या = त्या, च + या = च्या,ट + या = ट्या,म + ही = म्ही,ळ + या = ळ्या,ल + ली = ल्ली
कासवाची अक्कलहुशारी गोष्ट :
एका नदीत बहिरट कासव राहत होते. कासव नदीकिनारी फिरत असे. एकदा एक कोल्हा आला. त्याला खूप भूक लागली होती. कोल्ह्याला कासव दिसलं. कासवाचे मित्रही. कोल्हा हळूच त्यांना खायला पुढे झाला. येताना तो शिंकला. त्या आवाजाने सारे पळाले. बहिरट कासवाला काही ऐकू गेले नाही. कोल्हा त्याला खायला लागला. कासवाने आपले अंग कवचात ओढले. कासवाची पाठ टणक. कोल्ह्याला खाता येईना. कासवाला युक्ती सुचली, ते म्हणालं,
“कोल्होबा, तुम्ही मला पाण्यात टाका. माझी पाठ मऊ झाली की खा.”
कोल्ह्याने कासवाला पाण्यात टाकले. कासव म्हणालं,
“कोल्होबा, मी तुमच्या इतकाच हुशार आहे. कसे खाल आता तुम्ही?” असं म्हणत कासवाने पाण्याचा तळ गाठला. कोल्हा नुसताच बघत राहिला.

२२ मार्च
नियम – अकारान्त शब्दाच्या आधीचं अक्षर दीर्घ असतं.
कठीण, पूस, धूर, धूळ, खूप, दूर इत्यादी.
लेखन – धूर झाला, खूप धूर झाला, तू पाय पूस
एकाक्षरी इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घ असतात.
लेखन – तू हात धू, तू पाय धू, तू दूर गेलीस इत्यादी.
दोन्ही नियम प्रत्येकाने सांगणे.

१५ मार्च
बिघडलेल्या मुलाची गोष्ट.
राजू उधळ्या स्वभावाचा. आई – बाबा त्याला समजावून थकतात. शेवटी बाबा त्याला सांगतात आता तू पैसे कमवून आण. राजू पोती उचलून पोचवण्याचं काम करतो. पैसे आणून देतो. प्रत्येकवेळेला राजूने आणलेले पैसे बाबा विहिरीत फेकून देतात. राजूला खूप दु:ख होतं, राग येतो. बाबा त्याला मेहनतीने मिळवलेल्या पैशांची तो कसा उधळपट्टी करतो ते दाखवून देतात. राजूला चूक समजते.
गोष्टीवरून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देणे.
मी, ही, ती, तू, धू, पू नियम
एकाक्षरी इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घ असतात.
लेखन – हात धू, पाणी पी, तू पाय धू, तू आमटी पी.

८ मार्च 
थेंबा थेंबा येतोस कुठून कविता.
थेंब, जमीन, आकाश, नद्या, नाले, आटणे, शेते सुकणे, उपयोग या त्यातील शब्दांचा अर्थ, वाक्यात वापर.

I go to school.
My school is big.
I like my school.
ही वाक्य मराठीत लिहून दाखवणे.

१ मार्च 
I have notebook. My notebook is red ही वाक्य मराठीत लिहून दाखवणे.
दुकानात कटकट्या गिर्‍हाईक आलेला आहे आणि व्यवस्थापक त्याच्याशी बोलतो आहे यावरुन दोन गटात प्रवेश सादर करणे. प्रत्येक गटाच्या चुका आणि वापरलेल्या इंग्रजी शब्दांचा अर्थ सांगणे. जसं – Refund – परत देणे, Discount – सवलत, Manager – व्यवस्थापक, Final Sale – विकलेली गोष्ट परत घेतली जाणार नाही इत्यादी.
पळणे, रडणे, गाणे, जाणे, ठेवणे, देणे, बोलणे, सांगणे, कापणे, खेळणे या क्रियापदांचा वापर करुन वाक्यात उपयोग. मी, ती, तो, तू, ते, आम्ही, आपण ही सर्वनामं वापरुन वाक्य तयार करणे.


फेब्रुवारी २०२०

२३ फेब्रुवारी
दुकानात त्रास देणारी गिर्‍हाईक यावर दोन गटानी प्रवेश सादर करणे. त्यातील नविन शब्द – सूट, सवलत, टक्के, एकूण, शुभेच्छा.
आकारान्त पुल्लिंगी शब्दाचं अनेकवचन एकारान्त होतं. – कुत्रा – कुत्रे, आंबा – आंबे, घोडा – घोडे
आकारान्त नसलेल्या पुल्लिंगी शब्दांचं अनेकवचन तेच राहतं – देव – देव, लाडू – लाडू, खडू – खडू, कागद – कागद
चित्रातल्या गोष्टी मराठीत सांगणे – घसरगुंडी, झोपाळा, रोप, रोपटी, झाड, झाडे, कपाट.
लेखन, वाचन.

१६ फेब्रुवारी
शून्य ते झीरोचा प्रवास, निर्मिती याबद्दल माहिती.
दिनदर्शिकेबद्दल माहिती. अधिकमास म्हणजे काय, त्यातील तारखा ओळखणे इत्यादी माहिती.
३६ चा आकडा स्पष्टीकरण.
दिनदर्शिकेबद्दल माहिती. त्यातील तारखा ओळखणे.
शब्दवाचन.
एकाच शब्दांचे वेगवेगळे अर्थ – चिकू, म्हैस, कुत्रा, गाढव.

९ फेब्रुवारी 
मी शाळेत जाणार आहे आणि मी शाळेत जाईन यातील फरक.
मी, आम्ही, आपण, तू, तुम्ही, ते, तो, ती या सर्वनामांचा भविष्यकाळात वापर करुन वाक्य सांगणे.
उदा. मी शाळेत जाईन, आम्ही शाळेत जाऊ, आपण शाळेत जाऊ, तू शाळेत जाशील, तुम्ही शाळेत जाल, ते शाळेत जातील, तो शाळेत जाईल, ती शाळेत जाईल.

गोष्ट:
एक जंगल होते. त्या जंगलात एक नदी होती. नदीला खूप पाणी असायचं. नदीच्या काठावर तीन ससे खेळत. एक हत्ती पाणी प्यायला यायचा. हत्तीची आणि सशांची मैत्री झाली. एकदा अचानक वाघ आला. त्याची डरकाळी ऐकून ससे घाबरले. हत्तीने त्यांना युक्ती सांगितली.
वाघ सशांवर धावून आला पण तेवढ्यात हत्तीने त्याच्या सोंडेतलं पाणी वाघावर उडवलं. वाघ गोंधळला. सशांनी टुणकन उडी मारली आणि ते हत्तीच्या पाठीवर बसले. हत्तीने सशांना पलिकडच्या काठावर नेऊन सोडले.

गोष्ट ऐकल्यावर प्रत्येकाने एकेक वाक्य गोष्टीतील चित्र पाहून सांगणे. फळ्यावर लिहलेली वाक्य पूर्ण करणे.

व्याकरण नियम –
आकारान्त पुल्लिंगी शब्दाचं अनेकवचन एकारान्त होतं.
कुत्रा – कुत्रे, मुलगा – मुलगे, घोडा – घोडे.
पुल्लिंगी असलेल्या पण आकारान्त नसलेल्या शब्दाचं अनेकवचन तेच राहतं.
देव – देव, केस – केस, गाल – गाल इत्यादी

२ फेब्रुवारी 
गोष्ट. गोष्टीवरुन प्रश्नांची उत्तरं देणे.
चिंटू नावाचा एक मुलगा होता. तो बोरं विकत घ्यायला गेला. बोरंवाल्याने त्याला बोरं कमी दिली. चिंटूने विचारलं,
“काका, मला बोरं कमी का दिली?” बोरंवाला लबाड होता. तो म्हणाला,
“तुला न्यायला जड होऊ नये म्हणून.” चिंटूने बोरंवाल्या काकांच्या हातावर पैसे ठेवले आणि तो पटकन वळला. बोरंवाल्या काकांनी पैसे मोजले.
“चिंटू, तू पैसे कमी का दिलेस?” त्यांनी चिंटूला विचारलं.
“तुम्हाला पैसे मोजायचा त्रास होऊ नये म्हणून.” चिंटू म्हणाला आणि पटकन पळाला.

व्याकरण नियम समजून घेऊन त्या शब्दांचा वाक्यात उपयोग करणे.
नियम:
ती चप्पल – त्या चपला, ती मान – त्या माना, ती चूक – त्या चुका, ती तलवार – त्या तलवारी, ती गाय – गाई, ती गंमत – त्या गमती
अकारान्त स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन आ – कारान्त किंवा इ – कारान्त होतं.

वाचन, लेखन.


जानेवारी २०२०

२६ जानेवारी 
कौरव – पांडव गोष्ट सांगणे. गोष्टीबद्दल मुलांनीच, मुलांना प्रश्न विचारुन पूर्ण वाक्यात उत्तरं देणे.
मी आणि मला वापरण्याचे नियम मोठ्या मुलांनी लहान मुलांना सांगणे.
प्रजासत्ताक दिनांबद्दल माहिती. स्वातंत्र्यदिन आणि प्रजासत्ताकदिन यामधील फरक. घटना, राज्यघटना, संविधान, कवायत अशा शब्दांचे अर्थ.
गवताचं पातं कविता म्हणून दाखविणे.
लेखन, वाचन.

१९ जानेवारी 
तान्हाजीची गोष्ट सांगणे. त्यातील शब्दांचा अर्थ. जसं तोफ, किल्ला, किल्लेदार.
शिवाजी… होता. त्या…एक… होता.
किल्ला…
तान्हाजी… होता.
त्या… केले.
यातील गाळलेल्या जागा भरणे.
शिवाजी राजा होता. त्याचा एक किल्ला होता. किल्ला कोढांणा. तान्हाजी मावळा होता. त्यांने युद्ध केले.
दाखवलेल्या वस्तूंचे लिंग सांगणे. एकवचन, अनेकवचन सांगून वाक्यात उपयोग. जसं,
केळं, पुस्तक, दार – केळी, पुस्तकं, दारं. नपुंसकलिंगी.
नियम – अकारान्त नपुंसकलिंगी शब्दाचं अनेकवचन एकारान्त होतं.
लेखन, वाचन.

१२ जानेवारी 
तानाजीची गोष्ट.
गवताचं पातं वार्‍यावर डोलतं ही कविता म्हणून दाखविणे. कवितेतील शब्दांचा अर्थ सांगणे.
प्रत्येकाने कौरव – पांडवाची गोष्ट सांगणे.
वाचन, लेखन.

५ जानेवारी 
एक जंगल होते. जंगलात नदी होती. नदीत नेहमी भरपूर पाणी असायचे. एक हत्ती त्या नदीत आंघोळ करायला जायचा… या गोष्टीतील स्त्रीलिंगी, पुल्लिंगी, नपुंसकलिंगी शब्द सांगणे. त्यांचं अनेकवचन सांगणे. वाक्यात उपयोग करणे.
कौरव आणि पांडव, गुरुभक्त एकलव्य या गोष्टी. रामायण, महाभारत काय आहे याबद्दल थोडीशी माहिती. गोष्टींवरील प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरं देणे.
लेखन.


डिसेंबर २०१९

२९ डिसेंबर 
आई, बाबा, उशीर, काम, भावंडं या शब्दांवरुन गोष्ट तयार करुन दोन गटांनी प्रवेश सादर करणे.
प्रत्येकाने मुकाभिनय करणे. इतरांनी त्याचं वाक्यात रुपांतर करणे.
कविता वाचन – गवताचं पातं वार्‍यावर डोलतं…
चुलत, मावस, आत्ये भावंडं, मावशी, मामा, आजी, आत्या, काका नाती.

१५ डिसेंबर 
१ ते ५० आकडे म्हणणे, लिहिणे
गोष्ट वाचन – विचारलेल्या प्रश्नांना पूर्ण वाक्यात उत्तर देणे.
चालणे, चढणे, खोडणे, निवडणे, ठेवणे, धुणे, विसरणे हे शब्द, अर्थ, वाक्यात उपयोग.
विचार करणे, घासणे, बघणे, मान डोलावणे, एकटक पाहणे, वाट बघणे, डोळे मिचकावणे, चढणे, खोडणे, निवडणे, ठेवणे, धुणे, विसरणे हे शब्द, अर्थ, वाक्यात उपयोग.
लेखन

७ डिसेंबर 
पोहणे, हसणे, गाणे, नाचणे, धावणे, पळणे या क्रियापदांचा वापर भविष्यकाळात “आम्ही” आणि “ती” चा उपयोग करुन तसंच त्यात ’विषय’ घालून. उदा. आम्ही त्याच्याकडून पुस्तक घेऊ.
गवताचं पातं वार्‍यावर डोलतं हे गाणं संगीतखुर्ची खेळत पाठ करणे. त्यातील शब्दांचा अर्थ.
I like you, love you अशासारख्या वाक्य आणि शब्दांमधला फरक.
ने, ला, च्या, वर, खाली इत्यादींचा गाळलेल्या जागेत वापर.

१ डिसेंबर 
नपुंसकलिंगी शब्द आणि त्यांचं एकवचन आणि सर्व शब्द वापरुन प्रवेश सादर करणं – ते झाड – ती झाडं, ते मूल – ती मुलं, ते पुस्तक – ती पुस्तकं
घड्याळ – सव्वा, साडे, पावणे शिकणं. उदा. सव्वा सहा, साडेसहा, पावणेसात…
इंग्रजी वाक्यांचं भाषांतर – उदा. – They are stupid, They are smart, They are tall, They are short…
टिपूची गोष्ट भाग ३ – ४ – विचारलेल्या प्रश्नांची पूर्ण वाक्यात उत्तरं.
वाचन, लेखन.


नोव्हेंबर २०१९

१७ नोव्हेंबर 
कागदावर लिहिलेले शब्द वाचणे. त्यावरुन प्रवेश सादर करणे. प्रत्येकाने कमीतकमी ५ वाक्य बोलणे.
एकाने कागद डोक्यावर धरुन इतरांनी शब्दाचा अर्थ हालचालींनी दाखवणे. शब्द ओळखणे.
टिपू गोष्टीतील काही भाग.

१० नोव्हेंबर
सायमन सेजच्या धर्तीवर प्रत्येकाने मराठीतून इतर मुलांना गोष्टी करायला लावणे. त्यातून शिकलेले शब्द – हृदय, नस, शीर, तळवा, तळपाय इत्यादी.
फळ्यावर लिहिलेली वाक्य वाचायचा प्रयत्न करणे.
अव्ययांचा वापर – ने, ला, च्या इत्यादीचा वाक्यातील मोकळ्या जागेत उपयोग करणे.
ती साबण चेहरा धुतला – तिने साबणाने चेहरा धुतला.
ती आई टॉवेल दिला – तिला आईने टॉवेल दिला.
ती डोकं आंघोळ केली – तिने डोक्यावरुन आंघोळ केली.
ती टॉवेल केस पुसले – तिने टॉवेलने केस पुसले.
ती केस सुकले – तिचे केस सुकले.
टिपूच्या गोष्टीतील काही भाग आणि शब्दांचा अर्थ. टिपूच्या गोष्टीतील वाक्याचा काळ सांगणे.
वाचन, लेखन.

३ नोव्हेंबर २०१९
हुशार ससा गोष्ट.
व्याकरण नियम – एकअक्षरी इकारान्त आणि उकारान्त शब्द दीर्घ असतात – मी, ही, ती, तू, पू इत्यादी.
स्त्रीलिंगी इकारान्त शब्दाचं अनेकवचन याकारान्त होतं – वाटी – वाट्या, वही – वह्या, नदी – नद्या इत्यादी.
मराठी कविता – गवताचं पातं वार्‍यावर डोलतं. या कवितेवर संगीत खुर्ची. कवितेतील सर्व शब्दांचा अर्थ. – पाखरु, पातं, फांद्या, आंबा इत्यादी.
वाचन, लेखन.


ऑक्टोबर २०१९

ऑक्टोबर २७

शुभ दिपावली, हार्दीक, शुभेच्छा इत्यादी शब्दांचा अर्थ.
घरुन शाळेपर्यत येताना दिसणार्‍या गोष्टी आणि घरात असणार्‍या गोष्टी सांगण्याची दोन गटात स्पर्धा. प्रत्येक गटाने कमीतकमी २० शब्द सांगणे. त्यातले शब्द वापरुन वाक्य.

मुलांनी सांगितलेले शब्द
घर ते शाळा – रस्ता, लोक, गाडी, घर, झाड, पाणी, दिवे, दगड, पक्षी, नदी, फुलं, गवत, पानं, भाज्या, ससा, किडे, मांजर, शाळा, पदपथ, हरिण
घरातील गोष्टी – दार, भितं, पंखा, खिडकी, दूरदर्शन, चित्र, मुलं, झाड, खाद्यपदार्थ, सोफा, फोन, घड्याळ, दिवे, खुर्ची, टेबल, पुस्तक, कपडे, उशी, मांजर, कुत्रा, पाणी, पेला, काच.

मोठा गट – प्रेम, राष्ट्र, सर्व, सार्‍या या शब्दांमधील रफारचा वापर का, केव्हा आणि कसा करायचा. मुलांनी एकमेकांना शब्द सांगायचे आणि त्यांनी ते लिहायचे. नंतर वाक्यातल्या मोकळ्या जागा भरुन वाक्य पूर्ण करायचं.
पंख्या… बसून मी दूरदर्शन… चित्र… होतो/होते
तयार होणारं वाक्य – पंख्याखाली बसून मी दूरदर्शन बघत चित्र काढत होते/होतो.

२० ऑक्टोबर
ष आणि श मधील फरक आणि उदाहरणं. शाळा, शहर, कष्ट, प्रश्न, स्पष्ट इत्यादी.
मुळाक्षर उजळणी.
लेखन.
वाचन.
वर्गातील प्रेमळ भूत गोष्ट.

५ ऑक्टोबर 
दोन गटात स्पर्धा. एकेक गटाने गोष्ट तयार करुन मुकाभिनयाने सादर करायची. इतरांनी पूर्ण वाक्यात वापर करुन काय चालू आहे ते सांगायचं.
I am hungry – मी भुकेलेला आहे/ मी भुकेलेली आहे. अशाच प्रकारे तहानलेली/तहानलेला.
I am hungry – मी भूक लागली असं चुकीचं भाषांतर मुलं करतात. भुकेलेला, तहानलेला ही उदाहरणं देऊन I want to eat याचाच अर्थ मला भूक लागली याचं स्पष्टीकरण.
तसंच I am right – मी बरोबर आहे हे चुकीचं/ माझं बरोबर आहे हे ’बरोबर’ भाषांतर याबद्दल चर्चा.
वाचन, लेखन.


सप्टेंबर २०१९

२९ सप्टेंबर 
सांगितलेले शब्द लिहून दाखविणे. उदा. कर्तव्य, राष्ट्र, मी जाते, ती जाते, तो जातो, तू जातेस, आम्ही जातो, ते जातात.
मराठी शब्दांचा इंग्रजी अर्थ सांगण्याची दोन गटात स्पर्धा. शब्द – दरी, बुंधा, अपघात, तुळतुळीत, फडफडीत, रान, माळा इत्यादी.
गोष्ट.

२२ सप्टेंबर 
झाड, रस्ता, दिवे, अपघात, शब्दांवरुन वाक्य/गोष्ट तयार करणे. वाचून दाखविणे.
मुळाक्षर उजळणी.
लपाछपी.

१५सप्टेंबर
शाळेतलं भूत गोष्ट.
थंड, गंध, मंद, आनंद, संथ हे शब्द न बघता लिहिणे.
कासवाच्या कवचाची गोष्ट आणि त्यातील शब्दांचा अर्थ.

८ सप्टेंबर
शब्दलेखन.
नजर या शब्दाचा वेगवेगळ्या वाक्यात वापर आणि बदलणारा अर्थ.
एकवचन, अनेकवचन आणि लिंग – ते पान, ती पानं, तो कागद, ते कागद, ती नजर, त्या नजरा, तो दगड, ते दगड, तो चमचा, ते चमचे.

शिकलेल्या गोष्टी, गाणी, कविता यांचा दुवाविद्यार्थ्यांसाठी